शनिवार, २ मे, २००९

२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई

            विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्तित्वाची झलक मानवाला वारंवार देत आला आहे.भूकंप,महापूर,अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना मानव अगदी निष्प्रभ ठरतो.
            निसर्गाच्या अशा प्रकारच्या रौद्रशक्तिचा साक्षात्कार २६ जुलै,२००५ रोजी मुंबईकरांनी अनुभवला.कोणी कल्पनाही करू शकत नाही की,अवघ्या १२ तासात ९४४ मिलिमिटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद या दिवशी झाली.ऐन समुद्राच्या भरतीच्या वेळी आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळल्याने तसेच ठिकठीकाणी नाल्यांना नदीचे स्वरुप आल्याने मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले व जनजीवन विस्कळीत झाले.धरण क्षेत्रातही भरपूर पाऊस पडल्याने ते सरासरी पातळी पेक्षा जास्त भरले.यास्तव धरणाचे जास्तीचे पाणी सोडून द्यावे लागले.परिणामी,अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात भरच पडली.त्यामुळे संपूर्ण मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.विक्रमी पावसापासून वाहतूक प्रणालिही वाचू शकली नाही.रेलवे रुळावर पाणी असल्याने तसेच अनेक ठिकाणी रेलवे रुळ भरावासह वाहून गेल्याने मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी रेलवे सेवा ठप्प झाली.विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्याने  विमानसेवाही कोलमडली.रस्त्यावरही गुङघाभर पाणी असल्याने अनेक मोटारींच्या इंज़िनमध्ये जाऊन त्या बंद पडल्या.त्यामुळे ठिकठीकाणी वाहतूक कोंडी झाली.दूरध्वनी,मोबाइल फोन यांसारख्या सेवाही बंद झाल्याने मुंबईचा इतर उपनगरांशी होणारा संपर्क तुटला.अनेक भागात विजेच्या ट्रांस्फोर्मर मध्ये पाणी जाऊन विद्युत पुरवठाही खंडित झाला.
              २६ जुलै या दिवशी सुमारे १५ लाख पेक्षा जास्त लोक पावसाच्या थैमानामुळे मुंबईत अडकले होते असा शासनाचा प्राथमिक अंदाज आहे.अशा पूर स्थितीतही अनेक मुस्लिम लोकांनी तसेच स्वयंसेवि संघटनांनी मानवतावादाचा हात पुढे करून पूरात,बेस्ट च्या बसेस मध्ये तसेच मोटारीत अडकलेल्या लोकांना मोफत बिस्किटचे पुडे,पाण्याच्या बाटल्या,चहा वितरीत केला,तर बर्‍याच जणांचे प्राणही वाचवले.त्यांपैकी काही जणांनी दुसर्‍याचे  प्राण वाचवता वाचवता स्वतःचे प्राण वेचले.
                दरवर्षी भारत सरकारला करस्वरूपी १५ हजार कोटी रुपयाची रक्कम देणार्‍या तसेच भारताची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईची एका दिवसात अतिवृष्टीमुळे अशी दयनीय अवस्था झाली,याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका एकट्या मुंबईलाच बसला नाही तर तिच्या अन्य उपनगरांना व ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांनाही बसला.अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक जण त्यात वाहून गेले तर शेकडो लोकांचा ठाव-ठिकाणाही लागला नाही.यावरून सतत बदलणार्‍या या युगात भविष्यात मानव जातीसमोर कोणते संकट ओढवेल,हे कोणी सांगू शकत नाही.कारण,शेवटी माणूस नियतीपुढे हतबल आहे.अशा या भयंकर काळातून जे वाचले त्यांचे एकेक अनुभव ऐकताना अंगावर शहारे येतात.या संपूर्ण पार्श्वभूमीवर 
                                                                       "दैव जात दुःखे भरता 
                                                                         दोष ना कुणाचा 
                                                                         पराधीन आहे जगती 
                                                                         पुत्र मानवाचा"
                  या ग.दि.माडगुळकर यांच्या गीतरामायणातील ओळी अतिशय समर्पक वाटतात.   

हरवलेला तळमजला!!!

आज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी  व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला  तळमजला!!! श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...