गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

दिवाळी : तेव्हाची आणि आजची


पावसाळा संपल्यावर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, पितृ पंधरवडा, नवरात्रोत्सव, दसरा व कोजागिरी आदी सण संपलेले असत. सहामाही परीक्षा पण संपलेल्या असायच्या आणि सर्वांना उत्सुकता लागायची ती वर्षातील अति महत्वाच्या सणाची- अर्थात दिवाळी...

लहानपणी दिवाळी जवळ येऊ लागली याची जाणीव करून द्यायची ती छानशी गुलाबी थंडी आणि दिवाळी पर्यंत हवेतील गारवा हळूहळू वाढत जाई. याबरोबरच घरात खमंग पदार्थांचा अरोमा पसरत असे. परीक्षा संपेपर्यंत काय चालू आहे हे पहायलाही परवानगी नसे आणि नजर चुकवून एखादा पदार्थ उचललाच तर आईचा जोरदार फटका बसे. "नालायका, नैवेद्य अजून दाखवला नाही आणि तुझं आधीच? अभ्यास कर गपचुप. मार्क कमी मिळाले तर फटाके रद्द."

दिवाळीच्या दिवसांत घरी आलेल्या सर्व वस्तूंना एक विशिष्ठ गंध आणि स्पर्श असायचा. उटणं, सुगंधी तेल, रांगोळी, पणत्या, साबण, फटाके, नवीन कपडे अशा या गोष्टींची यादीच असायची. साबण हा मोती चंदनच असायचा. हे सामान दिवाळी येईपर्यंत वारंवार बघायला खूप गंमत वाटे. एव्हाना सहामाही परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी पडलेली असायची. दिवाळीचा गृहपाठ आणि दिवाळी अंक पटापट उरकले जायचे. ते एकदाचे फत्ते झाले की मग मोर्चा किल्ला बांधायला वळलेला असायचा. मातीची ती रंगीबेरंगी चित्रं, मन भरुन खेळायला मिळणारा चिखल, नरक चतुर्दशी पर्यंत उगवेल असं पक्कं मनात धरून किल्ल्यावर रोवलेली मोहरी ही सर्व धम्माल अजून आठवतीये.

नरक चतुर्दशी च्या आधीच अगदी वसुबारस पासूनच आमची दिवाळी चालू व्हायची. फार तर फार धनत्रयोदशी पर्यंत आकाशकंदिल लागलेला असे.

पहिल्या दिवाळी पहाट च्या आदल्या रात्री प्रत्येक दिवशी फटाके कसे फोडायचे याचे वर्गीकरण केले जाई. त्यात असायचे बाबा ब्राण्ड फुलबाज्यांचे पुडे, लवंगी व डांबरी फटाक्यांच्या माळा, भुईचक्र, नागाच्या गोळ्या वगैरे वगैरे. हे झाल्यावर मग गाढ झोप यायची. काहीच वेळात भल्या पहाटे जाग यायची ती क्षणाक्षणाला धडाडणार्या फटाक्यांनी. लगेच मग लागलीच उठून दात वगेरे घासून वेळ व्हायची अभ्यंग स्नानाची. भल्या पहाटे थंडी भरपूर असे आणि बाहेर मिट्ट काळोख. अशा वातावरणात आई उटणं लावायची आणि नंतर दिवाळीचा सर्वात खास विधी ऊरकला जायचा. अंघोळ झाल्यावर चिरांटू/ चिरांटे हे फळ पायाने फोडायला मजा यायची. ते फोडले म्हणजे आपण नरकासुराचा वध केला, असं आई सांगायची. या दिवशी एकदम शूरवीर असल्यासारखे वाटे. हे तर आजतागायत सुरुच आहे.

अंघोळ झाली की नवेकोरे कपडे घालायची मौज ती वेगळीच. मग आई औक्षण करायची. देवाला फराळाचा नैवेद्य दाखवला जाई आणि मग फराळाचा फडशा. एकत्र बसून फराळ व्हायचा आणि सोबत थट्टा-मस्करी.

भाऊबीजेच्या रात्री मी परिसरातील सर्व कंदिल पुन्हा पुन्हा न्ह्यायाळत असे आणि त्या फटाक्यांचा आवाज कानात आणि मनात साठवून ठेवत असे. कारण एकदा घरात गेल्यावर ते क्षण येण्यासाठी पुढील वर्षाच्या दिवाळी पर्यंत थांबावं लागणार, असं वाटे. अजून पण असंच आहे हे.

आता जग वेगात बदलतंय. सर्व काही ऑनलाईन झालंय, त्याचं स्वागतच आहे. हल्ली फराळ पण रेडीमेड मिळतोय. या सर्वांना माझा विरोध नाही. पण मूळचा निखळ आनंद, भाबडेपणा आपण विसरत चाललोय असं मला राहून राहून वाटतं. परस्पर भेटून आलिंगन देऊन शुभेच्छा देण्यात जो आपुलकीच्या स्पर्शाचा आपलेपणा आहे तो WhatsApp, SMS, email मध्ये नाही.

त्यामुळे जसजसं वय वाढतंय, तंत्रज्ञानाची प्रगती होतीये त्याप्रमाणे आपण सर्वच जण त्या लहानपणीच्या दिवाळी पासून दूर जात आहोत आणि या सर्व सद्यस्थितिमध्ये ती खोलवर रुतून बसलेली दिवाळी आणखी आठवत राहते.

हरवलेला तळमजला!!!

आज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी  व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला  तळमजला!!! श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...